अकोले (अहमदनगर) : भाजपा सरकार सिंचनाच्या मुद्द्यावर नाहक आमची बदनामी करत असून शेतकरीविरोधी युती सरकारमधील घटक पक्ष एकमेकांची उणीदुणी काढण्यातच व्यस्त आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली.इंदोरी येथे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विठ्ठल आभाळे लिखित ‘कथा निळवंडे धरणाची’ पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, भाजपा सरकारच्या पायगुणामुळे पाऊस पडेनासा झाला. भाजपाने दाखवलेले ‘अच्छे दिन’चे स्वप्न फोल ठरले आहे. युती सरकारमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत आहेत. दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. कर्ज माफीविषयी सरकार बोलायला तयार नाही. दुधाचे भाव गडगडले, बियाण्यांच्या किमती वाढविल्या. डाळींचे भाव वाढले. तत्कालीन आघाडी सरकारने समन्यायी पाणी वाटपाचा निर्णय घेतला. ही समाधानाची बाब असल्याचे स्पष्ट करत जलप्रकल्प तयार होताना काम लांबले तर किंमत वाढते, तसा निळवंडेचा प्रकल्प खर्च वाढला, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यग्र
By admin | Published: June 20, 2016 4:15 AM