मुंबई : वडाळ््याच्या बीपीटी वसाहतीतील पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे परिसरात चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करून देखील बीपीटी अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. वडाळा पूर्व भागात बीपीटी कामगारांच्या वसाहती आहेत. तिथे पाच हजारांहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कुटुंबे राहतात. मात्र येथील रेनॉल्ड्स कॉलनी, तेजस नगर, सद्भावना नगर, ओल्ड कॉलनी, न्यू कॉलनी या भागांत गेल्या वर्षभरापासून पथदिवे बंद आहेत. त्यामुळे सायंकाळी सहानंतर अंधाराचे साम्राज्य पसरते. अंधाराचा फायदा गर्दुल्ले आणि चोरटे घेतात. परिसरात छेडछाडीचे प्रमाणही वाढले आहे. तसेच गेल्या काही वर्षांत घरफोडीचे प्रमाण वाढल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वडाळा फलाट क्रमांक चारच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीआड अनैतिक आणि अश्लील प्रकार सर्रास होत आहेत. रेल्वे पोलिस आणि मुंबई पोलीस देखील मूक गिळून बसले आहेत. परिसरात पथदिव्यांची सोय करावी, अशी मागणी अनेकदा रहिवाशांनी बीपीटी अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र त्यांच्याकडून या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचीही मागणी बीपीटीतील रहिवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)
बीपीटीतील पथदिवे वर्षभर बंद
By admin | Published: April 28, 2016 2:50 AM