मेहकर (जि. बुलडाणा) : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राज्यात मृद आरोग्य व्यवस्थापन अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून फिरती व स्थायी मृद चाचणी प्रयोगशाळांची उभारणी करण्यात येणार असून शासकीय मृद चाचणी प्रयोगशाळांचेही बळकटीकरण करण्यात येणार आहे. माती परीक्षण करून त्यानुसार पीक घेतल्यास उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. पिकांची निवड करण्यासाठी माती तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनस्तरावरून राष्ट्रीय सूक्ष्मसिंचन अभियान, सेंद्रिय शेती प्रकल्प, मृद आरोग्य व सुपिकता व्यवस्थापन प्रकल्प आणि कोरडवाहू शाश्वत शेती कार्यक्रम या सर्व योजना राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान म्हणून राबविण्यात येतात. या अभियानांतर्गत केंद्राचा हिस्सा ५० टक्के व राज्याचा हिस्सा ५० टक्के आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागासाठी केंद्राकडून ६ कोटी ३९ लाख रुपये व राज्याकडून ६ कोटी ३९ लाख रुपये, असे एकूण १२ कोटी ७८ लाख रुपये मंगळवारी मंजूर केले आहेत. (प्रतिनिधी)प्रयोगशाळांच्या बळकटीकरणासाठी ४ कोटीफिरती व स्थायी मृद चाचणी प्रयोगशाळा उभारणीसाठी सर्वाधिक रक्कम ७ कोटी २८ लाख रुपये मंजूर करण्यात आली आहे. तर, शासकीय मृद चाचणी प्रयोगशाळांच्या बळकटीकरणासाठी ४ कोटी रुपये व खत नियंत्रण प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मृद प्रयोगशाळांचे बळकटीकरण
By admin | Published: November 04, 2015 2:36 AM