मुंबई : मंत्र्यांना वाटप करण्यात आलेल्या बंगल्यांवरुन तणातणी सुरूच असून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा मंत्रालयाजवळील क-३ हा बंगला काँग्रेसचे मंत्री के.सी.पाडवी यांना देण्यात आला. यावर गोऱ्हे संतप्त झाल्यानंतर आता त्यांना बंगला परत दिला जाणार आहे. पाडवी यांची रवानगी आता अ-५ बंगल्यावर करण्यात आली आहे.विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांना ब-१ हा बंगला पूर्वीच देण्यात आला आहे. मात्र कालच्या वाटपात त्यांना अचानक अ-३ हा बंगला देण्यात आल्याने ते नाराज झाले. आज त्यांना पुन्हा पूर्वीचाच ब-१ हा बंगला देण्यात आला. ब-१ बंगला राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना काल देण्यात आला होता. आज त्यांना अ-३ बंगला मिळाला.फडणवीस सरकारमधील क्रमांक दोनचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अ-९ हा बंगला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना देण्यात आला होता. पण काल तो राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आल्याने दरेकर संतप्त झाले. बंगल्यातून त्यांची रवानगी अवंती-अंबरमधील फ्लॅटमध्ये करण्यात आली. तो बदलून देण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, आज निघालेल्या आदेशात मुंडेंकडे अ-९ हा बंगला कायम ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड क-८ बंगल्यावर राहत होते. त्यांना क-१ हा बंगला देण्यात आला पण त्या बद्दल ते नाराज असल्याचे सांगण्यात येते. रात्री उशिरा त्यांना पुन्हा क-८ हा बंगला देण्यात आला.दीपक सावंत यांची नेतृत्वाबद्दल नाराजी!माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी जाहीरपणे त्यांची नाराजी बोलून दाखविली. मला पक्षात कोणतीही जबाबदारी दिली जात नाही. आज मी केवळ शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून बांधलेले शिवबंधन ठेवायचे की नाही याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून घेईन, असे त्यांनी सांगितले.
बंगल्यांवरून तणातणी; नीलम गोऱ्हेंचा बंगला पळवला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 4:05 AM