ठाणे : मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमधील लोकांमध्ये वाढत असलेल्या मानसिक ताणतणावांचे एक प्रमुख कारण शहरातील वाहतूककोंडी असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नैराश्य, संताप, मधुमेह, थकवा व हृदयरोग असे मोठे आजारही होऊ शकतात. एका कंपनीने भारतातील महत्त्वाच्या १० शहरांमध्ये केलेल्या ‘एज ऑफ रेज’ या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे.
महानगरांमधील अर्ध्यापेक्षा जास्त ५६ टक्के लोकांनी मान्य केले आहे की, वाहतूककोंडीमुळे जर ऑफिसला, कामाला जायला उशीर होत असेल, तर वाहतूक नियमांची पायमल्ली करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. २० टक्के व्यक्ती त्यांचा स्वभाव रागीट आणि तापट होण्यामागे प्रमुख कारण ट्रॅफिक असल्याचे सांगतात.
अनेक लोकांना असे वाटते की, ‘रोड रेज’ म्हणजे हिंसक घटना होय. पुढील गाडीच्या अगदी जवळून गाडी चालविणे, अचानक किंवा नियमबाह्य पद्धतीने लेन बदलणे, अतिवेग आणि इतरांना धमक्या देणे, हे प्रकारदेखील रोड रेजचाच भाग आहेत. देशात ८९ टक्के लोक सांगतात की, त्यांना ताणतणावांचा त्रास होत आहे. जागतिक पातळीवर याचे सरासरी प्रमाण ८६ टक्के आहे. सर्वेक्षणानुसार वाहतूककोंडीत तासन्तास अडकून पडावे लागल्यामुळे कितीतरी लोकांना राग आणि भांडणांना सामोरे जावे लागते. त्यातूनच नैराश्य आणि ताणतणाव वाढत आहेत. त्यातून मधुमेह, थकवा आणि हृदयरोग होण्याची शक्यता बळावते, असे तज्ज्ञ सांगतात.
डॉ. जयेश लेले म्हणाले की, हायपर टेन्शनग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येचे एक प्रमुख कारण म्हणजे शहरातील वाहतूककोंडी होय. गतिहीनतेमुळे नीट झोप लागत नाही. शरीरात मेलॅटोनिनचा स्राव मोठ्या प्रमाणावर होतो. वाहतूककोंडीत अडकल्याच्या भावनेमुळे क्लॉस्ट्रोफोबिया होऊन नैराश्य निर्माण होते.राग वाहतूक पोलिसांवर
- ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागलेले १६ टक्के लोक आपला राग टॅक्सी ड्रायव्हर्स आणि वाहतूक पोलिसांवर काढतात. यामुळे रस्त्यावरील गोंधळात आणखीनच भर पडते.
- ड्रायव्हिंगमुळे होणारे मानसिक ताणतणाव आणि त्यामुळे होणारे आजार आरोग्याला अतिशय घातक ठरतात.