नामदेव मोरे,
नवी मुंबई- कामाचा ताण व कारवाईच्या भीतीमुळे महापालिकेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य हरपले आहे. बुधवारी एकाच दिवशी दोन अधिकाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. तीन अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. दोन महिन्यांपासून सतत दबावाखाली राहावे लागत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यापासून कामकाजामध्ये शिस्त आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बेशिस्त कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ६ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. ७४ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले आहे. यामुळे कामकाजामध्ये शिस्त आली आहे. परंतु मानसिक स्वास्थ्य हरपत चालले आहे. तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे दोन महिने सतत अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेमध्ये व्यस्त आहेत. मुंबई बाजार समिती व तुर्भे गावातील कारवाई दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अतिक्रमण हटविण्यासाठी होणारा विरोध न जुमानता मोठ्याप्रमाणात अतिक्रमण हटविले. सततच्या कारवाईचा परिणाम शरीरावरही होवून बुधवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पालिकेमध्ये दिवसभर याच घटनेची चर्चा सुरू होती. सायंकाळी पाच वाजता मालमत्ताकर विभागात कार्यरत असणारे कर्मचारी सुदेश परब यांच्याही छातीत दुखू लागले. त्यांना काँगे्रसचे पदाधिकारी सुधीर पाटील, सुधीर पवार यांनी सीबीडीमधील एमजीएम रूग्णालयामध्ये नेवून दाखल करण्यात आले. एकाच दिवशी दोन घटना झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीचा विषय ऐरणीवर आला आहे. वाशी परिसरामध्ये पाणी समस्या गंभीर झाली आहे. दोन दिवस पाणी मिळाले नसल्याने नागरिकांनी २८ जूनला जलकुंभावर जावून तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या संजय पाटील नावाच्या अधिकाऱ्याचा रक्तदाब अचानक वाढला. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करावे लागले होते. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्याच्या दिवशीच एका कर्मचाऱ्याला निलंबित केले होते. तेव्हापासून सर्व कर्मचारी व अधिकारी वेळेत हजर राहू लागले आहेत. कामे वेगाने होवू लागली आहेत. याविषयी शहरात सर्वत्र आयुक्तांचे कौतुक होत असले तरी कर्मचाऱ्यांवरील ताण दिवसेंदिवस असह्य होत आहे. मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. वारंवार धारेवर धरले जात असल्याने अपमान झाल्यासारखे वाटू लागले आहे. महापालिका मुख्यालयापासून सर्वच कार्यालयामधील कर्मचारी हसणे विसरून गेले आहेत. निवांतपणे कोणाशी बोलता येत नाही. पाच मिनिट चहा पिण्यासाठी किंवा अत्यावश्यक कामासाठी गेले व आयुक्तांनी पाहिले तर कारवाई होण्याची भीती वाटत असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. >महासभा तहकूब सर्वसाधारण सभा सुरू असताना मालमत्ता कर विभागातील परब यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी तत्काळ रूग्णालयात नेण्यात आले. पहाटे विभाग अधिकारी भरत धांडे यांनाही हृदयविकाराचा त्रास झाला. या अधिकाऱ्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी महासभा तहकूब करण्याची मागणी केली. महापौरांनीही या मागणीचा विचार करून सभा तहकूब केली. >दोन महिन्यांतील महत्त्वाच्या घडामोडी एनएमएमटीच्या २०० पेक्षा जास्त चालक,वाहकांचे निलंबन वेळेवर न येणाऱ्या ७४ कर्मचाऱ्यांचे वेतन कापले सहा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे निलंबनउपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांच्यासह तिघांची स्वेच्छानिवृत्ती ऐरोलीमधील दोन डॉक्टरांचे एक दिवसाचे वेतन कापले