जामखेड (अहमदनगर) : नान्नज - गुरेवाडी रस्त्यावरील कौतुका नदीवर पूल बांधावा, गुरेवाडीपर्यंत रस्ता डांबरीकरण करावे, या मागण्यांसाठी गुरेवाडी ग्रामस्थांनी गुरुवारी कौतुका नदीत ठिय्या देत, जलसत्याग्रह केला. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. थंडी व पाण्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ चांगलेच गारठले होते. तालुक्यात गुरेवाडी-महारुळी ग्रामपंचायत आहे. या गावापासून दोन किलोमीटरवरील कौतुका नदीवर पूल व मुख्य रस्ता वगळता, इतर रस्ते नाही. पूर आल्यास गावाचा तालुक्याशी संपर्क तुटतो. या गावातील विद्यार्थी दररोज पायी ये-जा करतात. नदीला पाणी आल्यावर विद्यार्थ्यांना महिनाभर अघोषित सुट्टी घ्यावी लागते. याबाबत गुरेवाडी व नान्नज ग्रामस्थ आठ वर्षांपासून लढा देत आहेत, पण प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने, ग्रामस्थांनी कौतुका नदीच्या पात्रात उतरून उपोषण सुरू केले.नियोजन समितीच्या येत्या बैठकीत विषय घेऊन पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)
पुलासाठी नदीमध्येच ठिय्या
By admin | Published: October 14, 2016 2:25 AM