जेजुरी : सर्वत्र पाऊस पडावा व दुष्काळ दूर व्हावा, यासाठी खंडोबा पालखी सोहळा समिती मानकरी, खांदेकरी व जेजुरीकर ग्रामस्थांच्या वतीने रविवारी महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबादेवाच्या मंदिरात स्वयंभू लिंगावर लघुरुद्राभिषेक, महापूजा घालून कुलधर्म कुलाचाराचा धार्मिक विधी करीत साकडे घालण्यात आले.राज्यात दुष्काळाचे सावट असून पावसाने ओढ दिल्याने शेतकरीवर्ग व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. जून महिन्यातील तिसरा आठवडाही उलटला, तरी पावसाला सुरुवात न झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा हे प्रश्न उभे राहिले आहेत. राज्यात सर्वदूर पाऊस पडून दुष्काळ दूर व्हावा, यासाठी जेजुरीगडावर खंडोबादेवाच्या मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंगावर श्री खंडोबा पालखी सोहळा समिती, पालखीचे मानकरी, खांदेकरी तसेच ग्रामस्थांच्या वतीने लघुरुद्राभिषेक घालण्यात आला. कुलधर्म कुलाचाराप्रमाणे तळीभंडाऱ्याचा विधी करून खंडेरायाला पावसासाठी साकडे घालण्यात आले. या वेळी पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, देवसंस्थानचे विश्वस्त सुधीर गोडसे, मेहबूब पानसरे, खंडेराव काकडे, अरुण खोमणे, छबन कुदळे, जालिंदर खोमणे, सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, प्रकाश खाडे, शिवराज झगडे, रामदास माळवदकर, रामचंद्र भापकर, प्रशांत सातभाई, कृष्णा कुदळे, तसेच मानकरी-खांदेकरी, पुजारी, सेवकवर्ग उपस्थित होते. (वार्ताहर)
पावसासाठी खंडेरायाला साकडे
By admin | Published: June 20, 2016 1:08 AM