ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 : सणांनिमित्त होणा-या आतषबाजीमुळे ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली आहेत. ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद असून यासंदर्भात कठोर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र शासनाने पोलीस नियंत्रणास दिले आहेत.
ध्वनीप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगीक क्षेत्रात दिवसा 75 डेसीबल तर रात्री 70 डेसीबल एवढी ध्वनीमर्यादा असावी. व्यापारी क्षेत्रात दिवसा 65 डेसीबल तर रात्री 55 डेसीबल एवढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसीबल तर रात्री 45 डेसीबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा 50 डेसीबल ते रात्री 40 डेसीबल पर्यंत ध्वनीमर्यादा आहे.
ध्वनीप्रदुषणामुळे पर्यावरणाचा -हास, श्रवणशक्तीवर दुष्परिणाम,वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडण्याच्या अनेक शक्यतांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत चांगल्या आरोग्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. ध्वनीप्रदुषण नियम व नियमांचे उल्लंघन म्हणजेच नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे. नागरिकांनी पोलीसांत तक्रार करावी व पोलीसांनी तातडीने कारवाई करावी असे निर्देशही महाराष्ट्र शासनाने दिले आहेत.
ध्वनीप्रदुषण संदर्भातील घटनांची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष 100 या क्रमांकावर द्यावी. तसेच www.mumbaipolice.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आणि मुंबई पोलीस ट्विटर अकाऊंटवर माहिती द्यावी, असे आवाहन शासनाने केले आहे.