पुणे - कोंढवा परिसरात इमारतीची संरक्षण भिंत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मातीच्या ढिगाऱ्याखालून ३ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. यानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी या घटनेची चौकशी केली जाईल आणि यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते एका वृत्तवाहिनाला प्रतिकिया देताना बोलत होते.
कोंढवा परिसरात बडा तालाब मस्जिद परिसरात रात्री दीडच्या सुमारास भिंत कोसळल्याने या दुर्घटनेत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील हे कोल्हापूर येथून पुण्याकडे रवाना झाले आहेत. तर याप्रकरणी बोलताना चंद्रकात पाटील म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे ही पाटील म्हणाले. जिल्हाधिकारी यांना त्वरित एक समिती नेमून घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले असल्याचे चंद्रकात पाटील म्हणाले.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नियमानुसार शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मदत कार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.