मुंबई-
राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिल्या आहेत. राज्यात सर्वधर्मांमध्ये एकोपा राहावा यासाठी राज्याचं पोलीस दल तैनात आहे. सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच राज्यात ३० हजार होमगार्ड तैनात आहेत. याशिवाय राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या देखील सज्ज आहेत, अशी माहिती रजनीश सेठ यांनी यावेळी दिली.
राज ठाकरेंच्या भाषणाबाबत बोलत असताना रजनीश सेठ यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त याबाबत कारवाई करण्यात सक्षम आहेत असं म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडून केला जात आहे. त्यावर कायदेशीररित्या कारवाई करण्यास औरंगाबादचे पोलीस सक्षम आहेत. ते भाषणाचा अभ्यास करुन निर्णय घेतली, असंही रजनीश सेठ यांनी सांगितलं. तसंच याबाबत आजच कारवाई केली जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांना नोटीसमशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात मनसेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनसेच्या १५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक नोटीस पाठविण्यात आलेली आहे, असं पोलीस महासंचलकांनी सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. सामाजिक एकोपा टिकून राहावा यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला मी आवाहन करतो की शांतता व सुव्यवस्था राखावी आणि आम्हाला सहकार्य करावं, असं रजनीश सेठ म्हणाले.