देऊळगावराजे : दौंडच्या पूर्व भागातील खोरवडी, आलेगाव, देऊळगावराजे, पेडगाव येथील भीमा नदीपात्रावर असणाऱ्या बहुतांश बंधाऱ्यांना अद्याप ढापे बसवलेले नाहीत. त्यामुळे बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून, आगामी रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी कमी पडण्याची भीती शेतकरीवर्गातून पुढे येत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळा संपल्यानंतर आणि हिवाळा सुरू झाल्यानंतर संबंधित विभागाच्या वतीने दौंडच्या पूर्व भागातील बंधाऱ्यांवर ढापे बसविणे, जीर्ण ढापे काढून त्याजागी नवीन ढापे बसविणे यांसह अन्य कामे केली जातात. त्यामुळे येणाऱ्या रब्बी हंगामासाठी पुरेसा पाणीसाठा बंधाऱ्यात उपलब्ध होत असतो. तर, या वर्षी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने भीमा नदीपात्रात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा आहे; परंतु शासनाने चालू वर्षी या भागातील काही बंधाऱ्यांवर ढापे टाकले नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. समाधानकारक पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मुख्य नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केलेली आहे. तर, रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका याचबरोबर जनावरांना हिरवा चाऱ्याची पिके मोठ्या प्रमाणात घेतली आहेत. गेल्या वर्षी पाऊस कमी पडला; त्यामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. शेतीला ऐन उन्हाळ्यात पाणी मिळाले नाही, पिके पाण्याअभावी जळून गेली. पूर्व भागातील गावासाठी भामा-आसखेडचे पाणी सोडण्यात आले; पण ते दौंडच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचले नाही. यामुळे जास्त नुकसान या परिसरातील गावांचे झाले. आतापर्यंत बंधाऱ्याचे ढापे बसावण्याची गरज आहे. तेव्हा पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष घालून ढापे टाकण्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. >लवकरच कामाला सुरुवात करणारयाबाबत खडकवासला पाटबंधारे दौंड उपविभागाचे सहायक अभियंता सुहास साळुंके म्हणाले, की संबंधितांना याबाबत सूचना दिल्या असून लवकरच कामकाजाला सुरुवात होईल. दौंडच्या पूर्व भागातील खोरवडी, आलेगाव, देऊळगावराजे, पेडगाव येथील भीमा नदीपात्रावरील बहुतांश बंधाऱ्याला अद्याप ढापे बसवलेले नाहीत.
दौंडमधील बंधाऱ्यांवर ढापे टाका
By admin | Published: November 05, 2016 1:19 AM