मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीची सध्या मोठी वाताहत होत असून वर्षानुवर्षे असलेला नियोजनाचा अभाव, एसटी बसची असलेली दयनीय स्थिती आणि सातत्याने वाढत असलेले भाडे पाहता यंदाच्या गर्दीच्या हंगामात तर प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे एसटी सेवा गर्दीच्या हंगामात सुरुवातीच्या ४0 दिवसांतच ढेपाळली आहे. यात मुंबई आणि औरंगाबाद क्षेत्रात प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून अमरावती आणि नाशिक क्षेत्रातही स्थिती बिकटच असल्याचे समोर आले आहे. २0१0-११ मध्ये एसटीचे भारमान ६१.८४ टक्के होते. हेच भारमान २0११-१२ मध्ये ६१.७0 टक्के झाले. त्यानंतर, २0१२-१३ मध्ये ६0.४६ तर २0१३-१४ मध्ये ५८.५0 टक्के झाले. यावरूनच प्रवासी संख्या कमीकमी होत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, २0१४ च्या गर्दीचा हंगाम असलेल्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तरी परिस्थिती सुधारेल, अशी आशा एसटी महामंडळाला होती. मात्र, तसे न होता ती आणखीच बिकट होत चालली आहे. एसटीचा गर्दीचा हंगाम नेहमी १५ एप्रिलपासून सुरू होतो. यंदाच्या १ एप्रिल ते १0 मे या ४0 दिवसांची एसटीची परिस्थिती महामंडळाकडून तपासण्यात आली असता ती अक्षरश: ढेपाळल्याचे चित्र आहे. मुंबई क्षेत्रात येणार्या मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे विभागांतील भारमान मागील वर्षाशी तुलना करता यंदा ३.0३ टक्क्यांनी कमी झाले आहे. औरंगाबाद क्षेत्रात येणार्या औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणीचे भारमान २.५५ टक्क्यांनी कमी झाले आहे. अमरावती क्षेत्राचे २.४१ टक्क्यांनी, नाशिकचे १.७२ आणि नागपूर क्षेत्राचे १.१९ आणि पुणे क्षेत्राचे 0.९५ टक्क्यांनी कमी झाल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गर्दीच्या हंगामात एसटी ढेपाळली
By admin | Published: May 15, 2014 2:35 AM