ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. १७ - राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी इंटकने आज संप पुकारला आहे. मराठवाडयात उस्मानाबाद, बीड, औरंगाबादमध्ये या संपाला चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. उस्मानाबाद, बीडमध्ये एसटी बसेस रस्त्यावर नसल्यामुळे मात्र प्रवाशांचे हाल होत आहे.
एसटी कर्मचा-यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी या मागणीसाठी काँग्रेसप्रणीत इंटक संघटनेने हा संप पुकारला आहे. संप यशस्वी करण्यासाठी औरंगाबादमध्ये काही ठिकाणी एस.टी.बसचे टायर पंक्चर करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.
एसटी महामंडळातील इंटक ही सर्वात मोठी कामगार संघटना आहे. एसटीतील जवळपास ७५ हजार कामगारांचे इंटक प्रतिनिधीत्व करते. मराठवाडयाप्रमाणे राज्याच्या इतर भागात संपाला कसा प्रतिसाद मिळतो त्यावरही या संपाचे यश-अपयश अवलंबून आहे.