मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दोन दिवसांपूर्वीच्या भेटीवेळी हजर असलेले खा. संजय राऊत यांनी पवार यांच्या हवाल्याने केलेला दावा आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी १५ दिवसांत राज्याच्या राजकारणात दोन मोठे स्फोट होणार असल्याचा केलेला दावा यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
राऊत यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) मुखपत्रात रविवारी असे लिहिले की, उद्धव ठाकरेंसोबत मी शरद पवार यांना भेटलो. तेव्हा पवार हे ठाकरेंना म्हणाले की, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही. पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण पक्ष म्हणून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय आम्ही घेणार नाही. या बैठकीत पवार-ठाकरे यांचे असे मत पडले की जे भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील. पवार असेही म्हणाले की, जे भीतीने आज पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही भाजपत गेल्याने टेबलावरची फाइल कपाटात जाईल पण ईडी, सीबीआयच्या फायली कधीही बंद होत नाहीत. पवार-ठाकरे यांच्या या बैठकीतील माहिती खा. राऊत यांनी उघड केल्यानंतर भाजपमध्ये जाण्यासाठी पवार यांच्या कुटुंबातील कोणावर दबाव आहे, अजित पवार भाजपसोबत जाणार का, या चर्चांना उधाण आले.
असे लढवले गेले तर्कअजित पवार हे राष्ट्रवादीच्या ३५ ते ४० आमदारांसह भाजपसोबत जातील व मुख्यमंत्री होतील असा दावा एका इंग्रजी दैनिकाने रविवारी केला. मध्यंतरी अजित पवार हे पुण्यातून एकाएकी नॉट रिचेबल झाले होते तेव्हा ते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांसह दिल्लीत भाजप नेत्यांना भेटले, असे वृत्तही सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले. या सगळ्या गोंधळात अजित पवार हे महाविकास आघाडीच्या नागपुरात आयोजित मेळाव्याला उपस्थित होते.
गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी मुंबईत आले असता आपली त्यांच्याशी भेट झालीच नाही. मी रात्री मुंबईला गेलो नव्हतो. पुण्यात ‘जिजाई’ या माझ्याच घरी होतो. ढगात गोळ्या मारण्यात अर्थ नाही.- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री.
अजित पवारांचे गणित- मुख्यमंत्री शिंदे गटाच्या १६ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविले तरी शिंदे सरकार टिकेल, असे भाकीत अजित पवार यांनी वर्तविले. - ते म्हणाले, शिंदे सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा आहे. पैकी १६ अपात्र ठरले तरी शिंदे सरकारला १४९ आमदारांचा पाठिंबा असेल. १६ आमदार अपात्र ठरल्यास सभागृहाचे संख्याबळ २७२ असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस कधी कोणाचा घात करेल हे सांगता येत नाही. राष्ट्रवादी ज्या सत्तेत आहे त्यात आम्ही राहणार नाही. - संजय शिरसाट, आमदार, शिंदे शिवसेनाअजित पवारांसारखे नेते भाजपसोबत जाणार असतील तर आमचा विरोध नसेल.- खा. गजानन कीर्तीकर, शिंदे गटआमच्या सरकारला जो मदत करेल, समर्थन देईल त्याचे स्वागतच करू. - आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप
फडणवीस काय म्हणाले होते?काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत म्हटले होते. आमचे सरकार स्थिर असून एकदा शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असेही ते म्हणाले होते.
कारवायांचा धाक दाखवून अजित पवार, रोहित पवार यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप खा. राऊत यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला.