मुंबई : मुंबईसह कोकणातील संततधार वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला असून मराठवाडा व नगर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. पावसामुळे आलेल्या पुरात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला असून एकजण वाहून गेला आहे. वीज पडून पाच महिला जखमीझाल्या. येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. लोहारा (जि. उस्मानाबाद) तालुक्यातील मोघा (बु.) गावानजिकच्या ओढ्याला आलेल्या पुरामध्ये ५८ वर्षीय शेतकरी सुभाष भोंडवे वाहून गेले. उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे.सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात दुसऱ्या दिवशीही मंगळवारी रात्री पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली. माण आणि फलटण तालुक्यातही दमदार पाऊस बरसला. मंगळवारी रात्रीचा पाऊस माण तालुक्यात सर्वदूर झाला. मंगळवारच्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यात ५० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे.नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे आलेल्या पुराने मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मोसम नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. विशाल भावडू सोनवणे (९) व दर्शन विजय देवरे (११) अशी मृतांची नावे आहेत. पावसामुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ-नाशिक-मुंबई मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. सायंकाळनंतर मात्र रेल्वेसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याने प्रवाशांना रेल्वेस्थानकांवर अडकून प्रतीक्षा करावी लागली.पुण्यात एक हजार मिमीचा टप्पा पारसलग दुसºया दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती़ शहरात यंदा पावसाने १ एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे़ तर गेल्या २४ तासात पुणे शहरात ८७़३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ मंगळवारी पहाटे पडलेल्या पावसामुळे सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासात ५५़९ मिमी पाऊस पडला होता.वीज कोसळून पाच महिला जखमीविदर्भातील सर्वत्र पावसाचा जोर असून भंडारा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. अकोला जिल्ह्यातील पिंजर परिसरातील निहिदा येथे एका घरावर अचानक वीज कोसळून पाच महिला जखमी झाल्या. यातील दोन महिलांची प्रकृतीगंभीर आहे.
राज्यात सर्वत्र दमदार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 3:00 AM