ऑनलाइऩ लोकमत
मुंबई, दि. 28 - भगव्या फेटयातील बुलेटवर स्वार झालेल्या तरुणी, पारंपारिक मराठमोळया पोषाखात नटलेले तरुण-तरुणी, पुणेरी ढोल ताशाच्या गजरात आकाशात डौलाने फडकणारा भगवा झेंडा आणि सामाजिक संदेश देणारे विविध चित्ररथ हा सारा माहौल आहे गुढी पाडव्याच्या शोभा यात्रांमधला. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवसापासूनच मराठी नववर्षाची सुरुवात होते.
आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईसह, ठाणे, डोंबिवली, पुणे, नाशिक अशा राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शोभा यात्रा निघाल्या आहेत. प्रमुख रस्ते, चौक, गल्लीबोळ या शोभा यात्रांमध्ये सहभागी झालेल्या नागरीकांनी भरुन गेले आहेत. शोभा यात्रांची भव्यता त्यातून घडणारे संस्कृती, परंपरांचे दर्शन मनाला भारावून टाकणारे आहे. डोंबिवली, गिरगाव भागात निघणा-या शोभा यात्रांबद्दल विशेष आकर्षण असते. दरवर्षी या शोभायात्रांमध्ये एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न होतो.
डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त महारांगोळी साकारण्यात आली आहे. या महारांगोळीत त्यांच्याही जीवनातील विविध घटना चित्रित करण्यात आल्या आहेत. २५ महिला आणि २० पुरुष कलाकारांनी मिळून २८ तासांमध्ये ही रांगोळी साकारली. गणेश मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही रांगोळी नागरिकांना पाहता येणार आहे.