गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि नेत्यांमध्ये कमालीचे मतभेद दिसून येत आहेत. दरम्यान, आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शरद पवार यांनी बोचरी टीका केली होती. त्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे राष्ट्रीय नेते, भाजपच्या हुकूमशाही विरोधात लढण्याची क्षमता असलेले नेते आहे, असं प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत, राष्ट्रीय पातळीवर त्यांनी काम केले आहे. भाजपाच्या हुकूमशाहीविरोधात लढण्याची क्षमता असलेले ते नेते आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात आम्ही लुडबुड करण्याचा प्रश्न नाही. आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत. कोणाच्या पक्षात काय चालले आहे हे पहाणे आमचे काम नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत किती दिवस राहील ते माहीत नाही. भाजपबरोबर त्यांची बोलणी सुरू आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केला होता, त्यानंतर आज शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांचं त्यांच्या पक्षात काय स्थान आहे ते ए आहे की बी, सी किंवा डी आहे हे त्यांनी आधी चेक करावं. त्यांच्या पक्षापेक्षा सहकाऱ्यांना विचारावं की यांची कॅटेगरी कोणती आहे, ते तुम्हाला खासगीत सांगतील, जाहीरपणे नाही सांगणार.', अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली होती.