ठाणे : महाड येथील सावित्री नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व छोट्यामोठ्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. युद्धपातळीवर सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून आवश्यक डागडुजी आणि सक्षमीकरणाची कामे हाती घेण्याचे आदेश त्यांनी अधीक्षक अभियंता नाना पवार यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे, रेल्वेवरील उड्डाणपुलांचे आॅडिट करण्यासंदर्भात मध्य रेल्वेलाही पत्र पाठवले आहे.ठाणे जिल्ह्यात ठाणे खाडी, उल्हास नदी, वालधुनी तसेच काळू नदीवर पूल आहेत. तसेच, उड्डाणपूल आणि रेल्वेवरील उड्डाणपुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महाड येथील दुर्घटना घडल्यानंतर शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. कळवा येथील ठाणे खाडीवरील जुना पूल खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुलांची दुरुस्ती करण्याकरिता निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसेच जे पूल अत्यंत जुने व जीर्ण अवस्थेत असतील, ते बंद करून त्याजागी नवे पूल बांधण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘जिल्ह्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2016 4:50 AM