नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा (ता. भोर) येथील नीरा नदीवरील पुलाचे कठडे तोडून २०१३ साली कार नदीत पडून मोठा अपघात होऊनसुद्धा या महत्त्वाच्या पुलाकडे अजूनही प्रशासनाकडून दुरुस्तीसाठी लक्ष दिले नाही. या महामार्गावरील महत्त्वाच्या पुलावरून अजूनही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकरिता नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.पुणे-सातारा महामार्गावर पुणे व सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या या नीरा नदीवरील पुलाला साधारण ५० वर्षे झाली असून, महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामध्ये या जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला नवीन पूल बांधण्यात आले आहेत. मात्र पुण्याहून साताराकडे जाणारा पूल अद्यापही अपूर्ण असल्याने साताराकडे जाणारी वाहतूक या जुन्या पुलावरुनच होते आहे. या पुलाचे कठडे अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. त्यास साधा पत्रा व लोखंडी पाइप लावून जुजबी डागडुजी करून वेळ मारून नेली आहे. यामुळे पूल धोकादायक झाला आहे. नवीन पूल बांधण्यात आल्याने या पुलाच्या देखभालीकडे प्रशासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते आहे. त्यातच या पुलावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत, भेगा पडलेल्या आहेत. पुलाच्या सुरुवातीला उगवलेली झाडेझुडपे काढलेली नाहीत. मागील अपघातानंतर या ठिकाणी तकलादू दिशादर्शक फलक लावून प्रवाशांच्या जीविताशी खेळले जात आहे. नवीन होणारा पूल पूर्ण होईपर्यंत तरी या जुन्या पुलाचे कठडे पक्के बांधून तसेच दुरुस्तीसाठी स्ट्रक्चरल आॅडिट गरजेचे झाले आहे. महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी सुहास चिटणीस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या तज्ज्ञांच्या मते या जुन्या पुलाचे काम मजबूत असून, पुलावरील बाजूकडे काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील. नवीन पुलाचे काम संपादनाच्या काही किरकोळ अडचणींमुळे थांबले आहे, तेदेखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.(वार्ताहर)>कामात दुर्लक्ष : कठडे बसवण्याऐवजी केले काँक्रिटीकरणसन २०१३मध्ये या पुलावरूनच पुण्यातील चार जणांचा कार पाण्यात बेपत्ता होऊन मृत्यू झाला होता. सन २०१४ मध्ये एका ट्रकसह चालक व क्लिनर नदीच्या कोरड्या पात्रात पडले होते. एका आरामबसचा क्लिनर खाली उतरून बसचालकाला माहिती देत असताना पुलावरुन पाण्यात पडून मृत्युमुखी पडला होता. असे अनेक विविध अपघात या जुन्या पुलाच्या मोडलेल्या कठड्यांमुळे झाले आहेत. महाड घटनेनंतर महामार्गाच्या ठेकेदाराने पुलाच्या सारोळा बाजूकडील सुरवातीच्या डाव्या बाजूला खचलेला भाग सिमेंट काँक्रिटने भरुन घेतला आहे. मात्र त्या ठिकाणीदेखील कठडे नसल्याने अद्याप ती जागा धोकादायकच आहे.
सारोळा पुलाचे हवे स्ट्रक्चरल आॅडिट
By admin | Published: August 23, 2016 1:29 AM