नवी मुंबई : हार्डेलिया केमिकल कंपनीमुळे विस्थापित झालेल्या कुकशेतमधील प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये डावलले जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही व्यवस्थापन लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत व नवी मुंबई वसविण्यासाठी शासनाने ठाणे, पनवेल व उरण तालुक्यातील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली. परंतु येथील मूळ गावे आहेत त्याच ठिकाणी ठेवण्यात आली. परंतु कुकशेत या एकाच गावाचे स्थलांतर करावे लागले. तत्कालीन कामगार नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा केल्यानंतर कुकशेत, शिरवणे, जुईमधील प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात आली. कंपनी सुरू झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव कुकशेत गावचे स्थलांतर करावे लागले. पूर्ण गाव नेरूळ व सारसोळेच्यामधील भूखंडावर वसविण्यात आले. गावातील जवळपास २२ जणांना हार्डेलियामध्ये नोकरी दिली होती. यामधील काही जणांचा मृत्यू झाला आहे. नोकरीसाठी संघर्ष करावा लागलेल्या कामगारांना आता त्यांच्या वारसांसाठी संघर्षच करावा लागत आहे.कुकशेतमधील नगरसेवक सूरज पाटील यांनी हार्डेलिया व्यवस्थापनाशी वारंवार बैठका घेवून गावातील बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याची मागणी केली. परंतु व्यवस्थापनाने आश्वासनांशिवाय दुसरे काहीही दिले नाही. प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा येत असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कंपनी व्यवस्थापनाला पत्र पाठवून प्रकल्पग्रस्त मुलांना नोकरीत सामावून घेतले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)>कुकशेत ग्रामस्थांच्या जमिनीवर व मूळ गावाच्या जागेवर कंपनी उभी राहिली आहे. कंपनीमध्ये बेरोजगार स्थानिक तरुणांना नोकरी मिळावी अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. परंतु कंपनी व्यवस्थापन प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेत नसल्याने कंपनीसमोर ग्रामस्थ उपोषण करणार आहेत. - सूरज पाटील,नगरसेवक
प्रकल्पग्रस्तांचा नोकरीसाठी संघर्ष
By admin | Published: June 09, 2016 3:10 AM