नाशिक : शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर निघालेल्या संघर्ष यात्रेत पिंपळगाव बसवंत येथे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाषण सुरू असताना पाच ते सहा शेतकऱ्यांनी विषारी औषधाची बाटली व गळफास घेण्यासाठी दोरखंड आणून ते सरकारपर्यंत पोहोचविण्याची विनंती केली. मात्र त्यांना आंदोलक ठरवून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. संघर्ष यात्रेतील नेत्यांनी धावपळ करुन त्यांची सुटका केली. विखे यांचे भाषण सुरू असताना काही शेतकरी विषाच्या बाटल्या व दोरखंड दाखवत ते सरकारला द्या, असे सांगू लागले. त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सदर शेतकऱ्यांना पाटील यांनी व्यासपीठावर येऊन व्यथा मांडण्यास सांगितले. त्यांनी कर्जमाफीची मागणी केली. सभेनंतर नेते नाशिकच्या दिशेने निघाले असता रस्त्यातच त्यांना समजले की, शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नेत्यांचा ताफा पुन्हा पिंपळगावच्या दिशेने नेला़ (प्रतिनिधी)
संघर्ष यात्रा; सभेत विष अन् दोरखंड!
By admin | Published: April 18, 2017 5:47 AM