हिंगोली : राज्यात शेतकरीविरोधी भाजपा सरकार सत्तेत आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कर्जमाफी हा तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न. त्यावर इतिहासात प्रथमच सर्व विरोधी पक्षाच नेते एकत्र आले. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत या सरकारच्या विरोधात संघर्ष सुरूच राहिल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.कर्जमाफीच्या प्रश्नावर काँग्रेस- राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षाने काढलेली संघर्ष यात्रा शुक्रवारी दुपारी हिंगोलीत पोहचली. येथील इंदिरा गांधी चौकात जाहीर सभा झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, समाजवादी पक्षाचे आ. आबु आझमी, आ. कृष्णा पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आ. अमित झनक, आ. शशिकांत शिंदे, आ.डॉ. संतोष टारफे, आ. राहुल बेंद्रे, आ. सुनील केदार, आ. प्रदीप नाईक, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, संजय बोंढारे आदींची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी या सरकारकडे पैसा आहे. परंतु गेली तीन वर्षे दुष्काळामुळे व आज शेतमालाला भाव मिळत नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा नसल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. परिणामी, आता फडणवीस अडचणीत सापडले. वेळ आल्यावर निश्चित कर्जमाफीवर निर्णय घेतला जाईल, असे ते सांगत आहेत. परंतु दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कर्जमाफीचा निर्णय त्या- त्या राज्याच्या माथी मारण्याचा निर्णय जाहीर करून केंद्रांने अंग झटकल्याचा आरोपही त्यांनी केला.कर्नाटक सरकारने कृषी मूल्य आयोग आणून शेतकऱ्यांचा माल हमी भावाने खरेदीची काम सुरू केले. मात्र महाराष्ट्र सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. याबाबत जागृती झाली पाहिजे. राज्यात आमचे सरकार असताना हेच फडणवीस कापसाला ७ हजार रुपये भाव देण्याची व शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर आमच्याविरोधात ३०२ चा खटला का करू नये? अशी भाषा करत होते. अडीच वर्षात ८ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. (प्रतिनिधी)फडणवीस सरकार शेतकरीविरोधी - पवारअजित पवार यांनीही फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला. हे सरकार झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंगोली येथील कॉटन मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर फडणवीस सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.
कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत संघर्ष
By admin | Published: April 01, 2017 3:57 AM