ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 8 - उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पाऊल उचलण्यात आले. परंतु याचे समर्थन करता येणार नाही. हिंसेचे उत्तर हिंसेने देणे योग्य नाही. भारत-पाकिस्तानमधील समस्यांचे उत्तर युद्धातून मिळणार नाही या शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केंद्र सरकारच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या निर्णयावर टीका केली. नशामुक्त भारत आंदोलनाअंतर्गत काढण्यात आलेली राष्ट्रीय यात्रा शनिवारी नागपुरात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले. गांधी विचारांवर चालणारा आपला देश आहे.शेजारी राष्ट्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध असले पाहिजे. चर्चेतूनच सौहार्द निर्माण होतो. आत्मसुरक्षेचा सर्वांना अधिकार आहे. परंतु युद्ध हा अंतिम पर्याय असू शकत नाही. देशात ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून युद्धज्वर पसरविणे अयोग्य आहे. जी कृती पाकिस्तानने केली, तीच भारताने केली तर त्यांच्यात व आपल्यात काहीच फरक राहणार नाही, असे प्रतिपादन पाटकर यांनी केले.