ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारीत 'संघर्षयात्रा' चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी १९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. तशा जाहीरातीही प्रसिध्द झाल्या होत्या.
मात्र गोपनीथ मुंडे यांच्या कन्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्याने पुन्हा या चित्रपटाचे प्रदर्शन रखडण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांनी सेन्सॉर मंडळाला पत्र लिहून चित्रपटाला परवानगी न देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे पुन्हा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
हा चित्रपट आधी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण त्यावेळी अन्य कारण सांगून प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. शरद केळकरने गोपीनाथ मुंडे यांची तर, श्रुती मराठेने पंकजा मुंडे यांची व्यक्तीरेखा साकारली आहे.
चित्रपटाच्या प्रसिध्दीमध्ये कलाकार व्यस्त असताना पहिल्यांदा या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. चित्रपटाबद्दल पंकजा यांना नेमके काय आक्षेप आहेत त्याबद्दल चित्रपटाशी संबंधित कोणीही बोलायला तयार नाहीत.