मुंबई : एसटीचालकाच्या मृत्यूनंतर खवळलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत राज्यातील अनेक आगारांत आंदोलन केले. त्यामुळे काही काळ एसटी सेवा ठप्पच झाली होती.बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ठाण्याहून आलेली बस भिवंडी आगारात जात असताना त्याच्या गेटवरच उभ्या असलेल्या रिक्षावाल्याशी चालक प्रभाकर गायकवाड यांची बाचाबाची झाली. ते पुन्हा जाब विचारण्यासाठी गेले असता रिक्षावाल्यांनी केलेल्या मारहाणीनंतर गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. याचे पडसाद राज्यभरात उमटले. शुक्रवारी सकाळपासूनच काही एसटी आगारांत कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. ठाणे, भिवंडीबरोबरच नांदेड, वाडा, कंदार, आटगाव, जळगाव येथे डेपो बंद ठेवण्यात आले. यातील ठाणे, भिवंडी हे डेपो दिवसभरासाठी बंदच होते. तर अन्य डेपोतील सेवा दुपारनंतर पूर्ववत झाली. मात्र यामुळे प्रवाशांचे हाल झाले.मात्र एसटी महामंडळाने गायकवाड यांना मारहाण झाली नसल्याचा दावा केला आहे. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, रिक्षावाल्यांसमवेत झालेल्या वादाची माहिती कोणालाही न देता प्रभाकर गायकवाड निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर तेथून निघताना तेथेच ते कोसळले. पोलिसांनी त्यांना भिवंडीच्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र रात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असून, शरीरावर कोणत्याही जखमा झालेल्या नसल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांकडून याबाबत परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही गायकवाड यांच्या नातेवाइकांना दाखवण्यात आले. त्यात मारहाण झाली नसल्याचे आणि पोलीस स्टेशनमधून निघताना अचानक कोसळल्याचे दिसल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.एसटी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही एसटीकडून करण्यात आले आहे.
एसटीचा चक्काजाम
By admin | Published: February 11, 2017 5:14 AM