राजानंद मोरे - पुणे : रेल्वेच्या ‘रेल नीर’ या बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडप्रमाणेच आता एसटी महामंडळाचे ‘नाथ-जल’ लवकरच प्रवाशांना मिळणार आहे. वारकरी संप्रदायाचा बहुमान ठेवण्याच्या उद्देशाने ‘नाथ जल’ असे या ब्रँडचे नामकरण करण्यात आले आहे. राज्यभरातील बसस्थानकांवर या ‘ ब्रँड ’ नावानेच बाटलीबंद पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. खासगी यंत्रणेमार्फत ही सेवा पुरविली जाणार असून लवकरच ही प्रक्रिया पुर्ण होण्याची शक्यता आहे.प्रवाशांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे, तसेच त्यांची आर्थिक लुट थांबावी या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने काही वर्षांपुर्वी ‘रेल नीर’ या नावाने बाटलीबंद पाणी वितरण करण्यास सुरूवात केली. खासगी वितरकांच्या तुलनेत स्वस्त दरात शुध्द पाणी मिळत असल्याने ‘रेल नीर’ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सर्व रेल्वेस्थानकांवर हे पाणी उपलब्ध करून दिले जाते. तसेच रेल्वेगाड्यांमध्ये अधिकृत विक्रेत्यांकडेही हेच पाणी मिळते. काही खासगी कंपन्यांचे पाणी वितरण करण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर एसटी महामंडळाने आपल्या प्रवाशांना शुध्द व स्वस्त दरात पाणी देण्यासाठी पावले टाकली आहेत. रेल्वेच्या ‘रेल नीर’प्रमाणे एसटीकडूनही आपला स्वतंत्र ब्रँड आणला जाणार आहे. त्याला ‘नाथ जल’ असे नाव देण्यात आले आहे. ‘एसटी’तील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत एकनाथ यांच्या नावातील ‘नाथ’ हा शब्द घेऊन ‘नाथ जल’ असे नाव देण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाचा बहुमान करण्यासाठी हे नाव निश्चित करण्यात आले. दरम्यान, रेल्वेप्रमाणेच एसटी बसस्थानकांमध्ये सध्या विविध खासगी कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बाटल्यांची विक्री चढ्यादराने होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी असतात. एक लिटरची बाटली २० ते २५ रुपयांना दिली जाते. काही ठिकाणी थंड पाण्याची बाटली दिल्यास ‘कुलिंग’चे पैसे घेतले जातात. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लुट होते. अनेकदा स्थानिक ब्रँडच्या बाटल्याही चढ्या किंमतीने विकल्या जातात. यापार्श्वभुमीवर ‘एसटी’ने शुध्द व स्वस्त दरात बाटलीबंद पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ------------
रेल्वेच्या ‘रेल नीर’ ब्रँडप्रमाणेच एसटीचे ‘नाथ जल’ लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 7:00 AM
रेल्वेच्या ‘रेल नीर’प्रमाणे एसटीकडूनही आपला स्वतंत्र ब्रँड आणला जाणार आहे. त्याला ‘नाथ जल’ असे नाव देण्यात आले आहे.
ठळक मुद्दे रेल्वेप्रमाणेच एसटी बसस्थानकांमध्ये खासगी कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी उपलब्धसंत एकनाथ यांच्या नावातील ‘नाथ’ हा शब्द घेऊन ‘नाथ जल’ असे नाव