मुंबई : एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करत, भाडेतत्त्वावरील एसी ‘शिवशाही’ बसची घोषणा केली. जवळपास ५00 असलेल्या बस ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी डिसेंबरचा महिना उजाडण्याची शक्यता आहे. परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी पुढाकार घेत, जानेवारी २0१६च्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत्तीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे काही योजनांचे लोकार्पण केले. त्या वेळी शिवशाही बस सगळ्यांसमोर सादर करण्यात आली. या सोहळ्यानंतर ४५ आसनी एसी बस आणि ३0 आसनी स्लीपर एसी बस अशा ५00 बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे सांगत, लवकरच शिवशाही ताफ्यात येईल, अशी माहिती वारंवार देण्यात आली, परंतु ही बस नियोजित कालावधीत एसटीच्या ताफ्यात दाखल झाली नाही. त्यामुळे एप्रिल ते जून, गणेशोत्सव, दिवाळी या गर्दीच्या हंगामात एसटीला आर्थिक फटका बसला. आता या बसेस आणण्यासाठी महामंडळाकडून ताफ्यात दाखल करण्यासाठी प्रक्रिया पार पाडल्या जात असून, डिसेंबरपर्यंत शिवशाही बसेस ताफ्यात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या संदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजिंतसिंह देओल यांना विचारले असता, काही शिवशाही बसेस या डिसेंबरपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यानंतर पुढील वर्षात सर्व बसेस दाखल केल्या जातील. शिवशाही बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील, असे सांगितले. (प्रतिनिधी)
एसटीची ‘शिवशाही’ बस डिसेंबरपर्यंत?
By admin | Published: November 14, 2016 5:30 AM