सुशांत मोरे,
मुंबई- एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीचे आदेश काढताना नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. अशा ७0६ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश एप्रिलमध्ये काढण्यात आले असून, ते नियमित करण्यासाठी आता महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्याला गंभीर आजार असल्यास किंवा पती-पत्नीला एकाच ठिकाणी राहता यावे, यासाठी बदलीचा विनंती अर्ज करता येतो. मात्र एसटीत हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. एप्रिलमध्ये राज्यातील सुमारे ७0६ कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी एसटी महामंडळाकडे विनंती अर्ज केले होते. यामध्ये चालक, वाहक, लिपिक, लेखापाल, वाहतूक निरीक्षक यांचा समावेश होता. या बदल्यांचे आदेश एसटी मुख्यालयातील संबंधित विभागाकडून काढण्यात आले. मात्र हे आदेश काढताना ज्या कार्यालयातून कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, त्या कार्यालयाला आणि ज्या कार्यालयात बदली झाली त्या कार्यालयाला बदलीच्या आदेशाची प्रतच देण्यात आली नाही.बदली केल्यानंतर आदेशाची प्रत किंवा पत्र दोन्ही संबंधित विभागांना देणे आवश्यक असते, मात्र तसे न करता परस्पर बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे एप्रिलमध्ये बदली आदेश काढल्यानंतरही हे कर्मचारी अद्याप कामावर रुजू होऊ शकलेले नाहीत. संबंधित विभागांना बदलीच्या आदेशाची प्रतच मिळाली नसल्याने त्या विभागातील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यास तयार नाहीत. १५ जूनपासून रुजू करून घेण्याचा प्रयत्नयासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांना विचारले असता, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी यावर चर्चा करण्यात आली आहे. योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र आता १५ जूनपासून विनंती बदलीचे कर्मचारी कामावर रुजू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.