रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली गयाळ कोकरी येथे डुकराच्या शिकारीकरिता लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला गुरुवारी वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले.येथील सुनील राणे यांच्या आंबा कलमाच्या बागेत लावलेल्या फासकीत हा बिबट्या अडकला होता. कामगार सकाळी कामासाठी बागेत गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने फासकीत अडकलेल्या बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या प्रकरणी अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.दरम्यान, मादी जातीचा बिबट्या असून, ती सुमारे चार वर्षे वयाची आहे, तर बिबट्याची लांबी १५५ सेंमी. व रुंदी ६५ सेंमी. असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
फासकीत अडकलेला बिबट्या जेरबंद
By admin | Published: August 28, 2015 2:05 AM