सोलापूर : युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथील वालचंद कला महाविद्यालयात बुधवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एका विद्यार्थ्याने खेकड्यांमुळे खरच धरण फुटू शकते का?, असा प्रश्न विचारला. त्यावर आदित्य ठाकरेंनी त्याला उत्तर दिले.
आदित्य यांनी प्रथम त्या विद्यार्थ्याला त्याची शाखा विचारली. त्याने कॉमर्सचा विद्यार्थी असल्याचे सांगितले. तुम्ही हा प्रश्न इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनाही विचारायला हवा, असे सांगून आदित्य म्हणाले, धरण अनेकदा घर्षणामुळे फुटते. दगडावर पाण्याची लाट आदळत राहिली तर त्याचेही नुकसान होते. तसचं कुठेही जास्त अॅक्टिव्हिटी झाली तर ते होऊ शकते. खेकड्यांनी अॅक्टिविटी केल्यामुळे हे घडले असावे, असे गावकºयांना वाटलं होतं. इतर धरणाच्या ठिकाणी अशाप्रकारची अडचण झाली आहे का यावर संशोधन सुरू आहे. पण धरण कुणामुळे फुटले यापेक्षा आता इतर धरणे आहे, त्याचे मजबुतीकरण कसे करू शकतो हे पाहिले पाहिजे. ती धरणे सुरक्षित आहेत का हे तपासले पाहिजे. एकतर धरणे कमी पडत आहेत. ती वाढविली पाहिजेत़