लोकमत न्यूज नेटवर्कचिखली(बुलडाणा) : इयत्ता बारावीच्या परीक्षेत ७९.३८ टक्के गुण उत्तीर्ण होवून देखील केवळ इंग्रजी या विषयात कमी गुण मिळाल्याने १८ वर्षीय शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना चिखली तालुक्यातील कव्हळा येथे १७ जुलैच्या सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. विनायक संतोष लांडे वय १८ असे मृताचे नाव आहे. विनायक याने कॉमर्समधून इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला ७९.३८ टक्के गुण मिळाले. यामध्ये इंग्रजी या विषयात ५६ गुण मिळालेले असतानाही त्यास ते गुण कमी वाटत असल्याने तो तणावात होता. याच तणावातून शुक्रवारी सकाळी ५ वाजता तो आपल्या शेतात निघून गेला व शेतातील आंब्याच्या झाडाला त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. या परिसरात ‘मॉर्निंगवॉक’साठी गेलेल्या नागरीकांनी ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी त्याच्या कुटूंबियांना माहिती दिली. दरम्यान याबाबत अमडापूर पोलिसांना माहिती पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामाअंती शवविच्छेदन होवून विनायकचा मृत्यू कुटूंबियांना सोपविण्यात आला. मृतक विनायक याच्या पश्चात वडील संतोषराव लांडे, आई सविता व बहिण गायत्री असा परिवार आहे. तो सहकार विद्यामंदीर बुलडाणाचाविद्यार्थी असल्याचे समजले. दरम्यान अभ्यासातही हुशार होता. तथापी त्याला इंग्रजी या विषयात समाधानकारक गुण मिळालेले असताना आणि चांगल्या गुणांनी त्याने इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असतानाही त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शोकाकूल वातावरणात त्याच्या पार्थीवावर दुपारी अत्यंसंस्कार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
केवळ एका विषयात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 5:26 PM