रिधोरा (अकोला): दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असून, रविवारी एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्याने केवळ गणवेश व पुस्तकांसाठी आत्महत्या केल्याने, दुष्काळाची दाहकता ठसठशीतपणे अधोरेखित झाली. सततच्या नापिकीमुळे आपल्या शिक्षणासाठीही कुटुंबाकडे पैसे नसल्याचे पाहून, चिंतातूर झालेल्या बाळापूर तालुक्यातील या नववीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि पंचक्रोशीत खळबळ उडाली. बाळापूर तालुक्यातील दधम येथे विश्वनाथ खुळे हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. मोठा मुलगा वैभव हा इयत्ता अकरावीत शिकत असून, लहान मुलगा विशाल हा अकोला येथील महाराणा प्रताप विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत होता. खुळे कुटुंबाकडे दोन एकर शेती आहे. गतवर्षी त्यांना नापिकी झाली. त्यामुळे यंदा त्यांनी खरीप हंगामातील पिके घेण्यासाठी कंबर कसली. संपूर्ण कुटुंब शेतात राबले, सोयाबीन पेरले; मात्र यंदाही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पिकाला बसला. मशागत व लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच आर्थिक संकटात सापडले. अशा स्थितीत आपल्या शिक्षणासाठी पैशांची जुळवाजुळव कशी होईल, आपले शिक्षण कसे पूर्ण होईल, या विवंचनेतून विशालला नैराश्य आले. या नैराश्यातून त्याने रविवारी सकाळी विषारी औषध प्राशन केले. ही बाब त्याच्या कुटुंबीयाच्या लक्षात येताच त्याला उपचारासाठी तत्काळ अकोला येथे रवाना करण्यात आले; मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
*विशाल अभ्यासात होता हुशार!
आत्महत्या केलेला विद्यार्थी विशाल खुळे हा अभ्यासात हुशार होता. काही दिवसांपासून तो आजारी होता, असेही काही ग्रामस्थांनी सांगितले. नापिकीमुळे उत्सवांवर विरजण खुळे कुटुंबीय सतत दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहे. नापिकीमुळे जवळ पैसा नाही. त्यामुळे दसरा, दिवाळीसारखे सणही ते साजरे करू शकले नाही. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कोठून आणावा, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता.
**गणवेशासाठी हट्ट
विशालने दिवाळीपूर्वीपासूनच गणवेश आणि पाठय़पुस्तकांसाठी हट्ट धरला होता; मात्र पैसेच नसल्याने त्याचा हट्ट पूर्ण होत नव्हता. त्याला काही पुस्तके मिळाली होती. उर्वरित पुस्तकांसाठी त्याचा आग्रह कायम होता.
***बॅँकेचे ४0 हजार रुपयांचे कर्ज
विशालचे वडील विश्वनाथ खुळे यांनी शेतीसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून ४0 हजार रुपयांचे कर्ज काढले; मात्र सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडता आलेले नाही.