वाशिम: दहावीची परीक्षा जसजशी जवळ येऊ लागते, तसतसा प्रत्येकजण जोरदार अभ्यास करू लागतो. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू असतो. परीक्षा केंद्रावरदेखील पुस्तकात डोकं खुपसून अभ्यास करताना दिसतात. मात्र वाशिमच्या एका परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचं लक्ष काही वेळासाठी विचलित झालं. एक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर येताच अनेक विद्यार्थी त्याकडे एकटक पाहू लागले. हा विद्यार्थी ज्या वर्गात परीक्षा देण्यासाठी गेला, तिथेदेखील सर्वचजण त्याच्याकडे पाहत होते. विशेष म्हणजे या विद्यार्थ्याला पाहून पर्यवेक्षकदेखील चक्रावून गेले. दहावीची परीक्षा देण्यासाठी जऊळका रेल्वे येथील केंद्रावर गेलेल्या निलेश पंजाब डहानेला पाहताच सर्वच आश्चर्यचकीत झाले. कारण निलेशची उंची अडीच फूट इतकी आहे. त्याचं वय 16 वर्षे असलं, तरी त्याची शारीरिक वाढ झालेली नाही. त्यामुळे निलेश चुकून वर्गात आल्याचा पर्यवेक्षकांचा गैरसमज झाला. त्यामुळे सर्वच पर्यवेक्षकांनी याबद्दल शहानिशा केली. त्यावेळी तो दहावीचाच विद्यार्थी असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. निसर्गत:च निलेशची उंची कमी असल्यानं तो १६ वर्षे वयाचा वाटतच नाही. 'सुरुवातीच्या काळात आपल्याला उंचीबद्दल खंत वाटत होती. सर्व मित्रांची उंची किमान चार ते पाच फूट असताना आपण त्यांच्यात खूपच बुटके दिसत असल्याने वाईट वाटायचे. परंतु आता ती खंत राहिली नाही,' अशी भावना निलेशनं व्यक्त केली. सर्वसामान्यांप्रमाणेच आपण जीवन जगत असून, शैक्षणिक प्रगतीतून आपणास विकास साधायचा आहे. शारीरिक विकास हा प्रगतीसाठी महत्त्वाचा नसतो, असा अत्यंत प्रगल्भ विचार निलेशनं मांडला.
...अन् काही वेळासाठी सर्वच विसरले दहावीची परीक्षा; संपूर्ण शाळेत त्याचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 5:03 PM