मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील जेवणाचा अतिशय सुमार दर्जा स्वत: अनुभवल्यानंतर आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती स्वयंपाक घर (सेंट्रलाईड् किचन) राबविण्याचे ठरविले आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने या वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येतील.मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत ही माहिती दिली. राज्यातील इतर जिल्ह्यातील वसतिगृहांच्या तुलनेत मुंबई, पुणे येथील वसतिगृहे बऱ्या परिस्थितीत आहेत. मात्र इतर ठिकाणच्या वसतीगृहाची अवस्था फारच कठीण आहे.यातील अनेक इमारतींची नव्याने बांधणी, पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या सर्व इमारतींच्या सुधारणेचा विचार सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच सर्वच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चांगले भोजन मिळावे यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील पुरवठादार, ठेकेदारांना संधी देवून मध्यवर्ती स्वंयपाक घर सुरू करण्यात येणार आहे. नीटनेटके स्वयंपाकघर त्यासाठी असेल आणि जेवणाचा दर्जा निश्चितपणे सुधारेल, असे ते म्हणाले.
मध्यवर्ती स्वयंपाकघरातून विद्यार्थ्यांना जेवण; राज्यात वसतिगृहांमध्ये सीसीटीव्हीही बसविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 4:23 AM