पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या बैठकीपूर्वी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतरही गजेंद्र चौहान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या सादाला प्रतिसाद म्हणून का होईना त्यांच्याकडून निमंत्रण आल्यास आमचे काही विद्यार्थी त्यांच्याशी संवाद साधण्यास जाऊ शकतील. तसेच पुनश्च ते संस्थेमध्ये आल्यास त्यांना कोणताही विरोध केला जाणार नाही, अशी मवाळ भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान असलेली व्यक्ती ही विद्या परिषदेच्या प्रमुखपदी कार्यरत असते. त्यामुळे लायकीची नसलेली व्यक्ती शैक्षणिक निर्णय कसे घेऊ शकते, हीच गोष्ट विद्यार्थ्यांना खटकली असल्याने चौहान यांच्या नावाला विरोध दर्शवित तब्बल १३९ दिवस त्यांनी संप पुकारला. गुरुवारीही नियामक मंडळाच्या पहिल्या बैठकीपूर्वी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत चौहान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. चौहान अध्यक्षपदी विराजमान झाले असले तरी ते काय निर्णय घेतात यावर आंदोलन सुरू ठेवायचे का नाही, हे ठरविण्यात येईल. मात्र त्यांनी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर त्यांनी निमंत्रण दिल्यास आमचे काही विद्यार्थी संवाद साधण्यास नक्कीच जाऊ शकतील, असेही तो म्हणाला. बैठकीपूर्वी आंदोलन करण्यासंदर्भात काही ठरले नव्हते. ते प्रातिनिधिक आंदोलन होते. मात्र पुन्हा चौहान संस्थेत आल्यास आम्ही कदाचित आंदोलन करणारही नाही असेही त्याने सांगितले. (प्रतिनिधी)
संवादासाठी विद्यार्थी राजी
By admin | Published: January 09, 2016 1:44 AM