ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 27 - नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वत्र पैशांची चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जिवनातच बचतीची सवय लागावी व बँक व्यवहाराची माहिती व्हावी, या हेतूने कॉन्व्हेंटमध्येच बँक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जि. प. उच्च प्राथमिक शाळा धोडप, ता. चिखली येथील विद्यार्थ्यांनी शाळेत सुरू केलेली जिजाऊ स्कूल बँक नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आली आहे. शिक्षक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत सुरू केलेल्या या जिजाऊ स्कूल बँकेत विद्यार्थी आपले खाते उघडून पासबुकमध्ये १ रुपयापासून, तर १०० रुपयापर्यंत एकावेळी पैसे जमा करू शकतात. तसेच गरज असताना पैसे काढतात.या बँकेचे व्यवहार विद्यार्थीच पाहतात. बँकेची वेळ सकाळी १० ते १०.३० व दुपारी २ ते ३.०० अशी असते. या बँकेचा मॅनेजर अनिकेत तवर याची निवड विद्यार्थ्यांनी सर्वानुमते केलेली आहे. तो बँकेचा हिशोब चोखपणे सांभाळतो. तसेच शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री वैष्णवी तवर हिचीसुद्धा बँकेवर देखरेख असते. या शाळेतील शिक्षक गायकवाड, सोनुने, खिचडी शिजविणाऱ्या बेबीताई कोल्हे यांनी सुद्धा या बँकेत खाते उघडून नियमित बचत करतात व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. विद्यार्थी सहलीसाठी, शालेयसाहित्य खरेदीसाठी मोठ्या उत्साहाने नियमित बचत करतात. शाळेचे मुख्याध्यापक एम. डी. पठाण हे अशा शालेय उपक्रमांना प्रोत्साहन देतात व विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देवून त्यांचा सर्वांगिण विकास साधतात. जि. प. उच्च प्राथमिक शाळा धोडप ही शाळा १०० टक्के प्रगत झाली असून या शाळेत बालवाचनालय, विज्ञान प्रयोगशाळा, विद्यार्थी संगणक कक्ष, शालेय मंत्रिमंडळ, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम नियमित घेतले जातात. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
नोटाबंदीमुळे कॉन्व्हेंटमध्ये सुरू केली विद्यार्थ्यांची बँक
By admin | Published: December 27, 2016 5:50 PM