पुणे : राज्य शासन व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाची भरती गेल्या २ वर्षांपासून बंद ठेवली आहे. तसेच, विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) पदासाठी जाहिरात अद्याप काढलेली नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी येत्या ११ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.शहरातील विविध अभ्यासिकांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची सोमवारी गोगटे प्रशालेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. शहरातील सुमारे ५००हून अधिक विद्यार्थी या बैठकीला उपस्थित होते. किरण निंभोरे, नीलेश निंबाळकर, सागर झाडे, अमोल हिप्परगे, नागनाथ जावळे आदी विद्यार्थ्यांनी सर्वांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर येत्या ११ जुलै रोजी सकाळी ९ वाजता शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यानंतरही शासनाकडून हालचाली झाल्या नाहीत, तर पावसाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्याचा ठराव बैठकीत मंजूर केला.पीएसआयच्या १ हजार पदांची जाहिरात काढावी. एसटीआय व टॅक्स असिस्टंट या दोन्ही पदाची २०१६ची जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करावी, राज्यसेवा, एसटीआय आदी पदांच्या जागांमध्ये वाढ करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)पीएसआय पदाची भरती प्रक्रिया स्पर्र्धा परीक्षांच्या माध्यमातून न घेता खातेनिहाय केली जात आहे. नुकतेच एसटीआयची खातेनिहाय पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांसाठी विद्यार्थी गेल्या तीन-चार वर्षांपासून तयारी करीत आहेत. मात्र, शासनाकडून केवळ खातेनिहाय भरती केली जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.- किरण निंभोरे,विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी वाचला अडचणींचा पाढा
By admin | Published: June 28, 2016 12:55 AM