उल्हासनगर - शहरातील सेंच्युरी शाळेत ६ वर्षांच्या अर्जुनसिंग जिना याला जेवल्यानंतर उलट्या झाल्या असता रुग्णालयात न नेता शाळा सुटेपर्यंत बेंचवरच झोपविल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला असून, संतप्त नागरिकांनी शाळेची तोडफोड केली आहे. उल्हासनगर शहाड गावठाण परिसरात सेंच्युरी कंपनीची सेंच्युरी इंग्रजी माध्यमाची शाळा असून, सकाळी साडेसात वाजता माया मोहनसिंग जिना यांनी नेहमीप्रमाणे अर्जुनसिंग जिना या सहा वर्षांच्या मुलाला शाळेत सोडलेहोते. सकाळी १०.३० वाजता मुलाला आणण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ गेलेल्या माया यांना वर्गशिक्षिका प्रेमा यांनी अर्जुनसिंग बेशुद्घ पडल्याचे सांगितले. त्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला असता त्याने डोळे उघडून बंद केले. त्यांनी त्वरित त्याला कंपनीच्या रुग्णालयात दाखल केले. औषधोपचार सुरू असताना दुपारी दीड वाजता त्याचा मृत्यू झाला. उल्हासनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून, त्याचा खाऊचा डबाही ताब्यात घेण्यात आला आहे. (वार्ताहर)
शाळेच्या हलगर्जीने विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Published: July 02, 2014 4:16 AM