सुरेश लोखंडे , ठाणेजिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी, दुर्गम भागांत भारनियमन मोठ्याप्रमाणात सुरू आहे. त्यामुळे वीजपुरवठ्या अभावी विद्यार्थ्यांना रात्रीचा अभ्यास करणे शक्य होत नाही. यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदने एक कोटी रुपयांची तरतूद केली आणि एक लाख ५३ हजार ९४५ विद्यार्थ्यांना रात्रीच्या अभ्यासासाठी सौर दिवे पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे या विद्यार्थ्यांना सौर दिव्यांपासून वंचित राहवे लागले आहे़या आर्थिक वर्षाच्या अर्थंसंकल्पात तरतूद करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सौर दिव्यांचे वाटप करण्याचा ठराव जिल्हा परिषद सदस्यांनी मंजूर केला. पण हलगर्जीपणामुळे जिल्हा परिषदेने सौर दिवे खरेदीकडे दुर्लक्ष केले. परिणामी विद्यार्थी अद्याप त्यापासून वंचित राहिले आहेत. या दिव्यांच्या प्रकाशात विद्यार्थ्यांना प्रथम सत्राच्या परीक्षेचा अभ्यास करणे शक्य होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांना योग्यवेळी त्याचा लाभ घेता आलेला नाही.ग्रामीण व दुर्गम भागांतील बहुतेक विद्यार्थ्यांच्या घरी वीजपुरवठा होत नाही. तर ज्यांच्याकडे वीज आहे, त्यांना लोडशेडिंगमुळे गैरसोयींचा सामना करावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी सर्वच आदिवासी विद्यार्थ्यांना सौर दिवे पुरवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. पण तिचा लाभ अद्यापही विद्यार्थ्यांना करून देण्यात आला नाही. यामुळे आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसह सामाजिक संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
विद्यार्थी सौर दिव्यांपासून वंचित
By admin | Published: October 23, 2014 3:53 AM