मुंबई : राज्यातील १७ टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही मराठीचे आकलन होत नसल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या लर्निंग फाउंडेशन स्टडीच्या अहवालातून स्पष्ट होत आहे. देशपातळीवर ही टक्केवारी १८ टक्के आहे. इंग्रजी आणि हिंदी विषयांच्या तोंडी आकलनाबाबत राज्य व देशाची सरासरी अनुक्रमे १२ व १५ टक्के अशी आहे. मात्र, शब्दांचे अर्थ उलगडताना किंवा अर्थ समजून घेताना मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या ५० पैकी ४१ विद्यार्थ्यांना ते सहज येते तर इंग्रजी व हिंदी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या ५० पैकी ४० विद्यार्थ्यांना ते समजणे सोपे जाते.
तीन ते नऊ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा सुरुवातीचा भाषा विकास होण्यासाठी इयत्ता तिसरीपर्यंतच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत निपुण भारत (मूलभूत साक्षरता संख्याज्ञान अभियान) अभियान राबविण्यात येत आहे.
सर्वेक्षणाचे निष्कर्ष -राज्यातील २२ टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही पेपर व पेन्सिलच्या साहाय्याने बेरीज- वजाबाकी येत नाही.
- ८३% विद्यार्थ्यांना हाताच्या साहाय्याने आकडेमोड करता येत नाही. -५४% केवळ विद्यार्थ्यांना घड्याळात किती वाजले आहेत याचे ज्ञान आहे. त्यातील ३९ टक्के विद्यार्थ्यांना त्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागते आहे. - ४१% विद्यार्थ्यांना अपूर्णांकाबद्दलची माहिती नसून त्यांना ते बरोबर ओळखता येतात आणि ४३ टक्के विद्यार्थी ते योग्य पद्धतीने दाखवू शकतात.
किमान प्रावीण्य पातळीवर पोहोचण्याची आवश्यकताजागतिक पातळीवरील भाषेतील किमान प्रावीण्य मिळविणाऱ्या राज्यातील मराठी भाषेतील विद्यार्थ्यांची टक्केवारी २८ टक्के असून इंग्रजी भाषेतील २२ टक्के तर हिंदी भाषेतील विद्यार्थी संख्या २० टक्के आहे. या प्रावीण्य रेषेच्या खालील विद्यार्थ्यांची संख्या मराठी भाषेत १३ टक्के इंग्रजीत १२ टक्के तर हिंदीमध्ये २५ टक्के आहे.
भाषा आणि गणितावर सर्वेक्षण आधारित२०२६-२७ पर्यंत निपुण भारत हा कार्यक्रम सर्व राज्यांमध्ये समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत चालविला जाणार आहे. याचअंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे एससीईआरटीकडून २६ ते ३१ मार्चदरम्यान पायाभूत अध्ययन अभ्यास हे नमुना सर्वेक्षण राबविण्यात आले. विशेषतः तिसरीच्या प्रमुख भाषा व गणिती आकडेमोड यांच्या अध्ययन निकषपट्टीवर हे सर्वेक्षण आधारित आहे. या सर्वेक्षणातील विद्यार्थ्यांची राज्य स्तरावरील संपादणूक पातळी ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक चांगली असल्याचे दिसून आले आहे.