मुंबई : इयत्ता सातवीची गणित, सामान्य विज्ञान, इतिहास व नागरिकशास्त्र ही पुस्तके बालभारतीने छापल्यावर मुलांच्या हाती येण्याआधीच संकेतस्थळावर आणि व्हॉट्सअॅपवर आली आहेत. यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे. अभ्यासक्रमात काय बदल करण्यात येणार याची उत्सुकता शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थ्यांना होती. सातवीच्या तीन विषयांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले असून त्याची पुस्तके तयार आहेत. गणित, सामान्य विज्ञान, इतिहास व नागरिकशास्त्राच्या पुस्तकांची छपाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे छपाई पूर्ण झालेल्या या पुस्तकांच्या पीडीएफ बालभारतीच्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर संकेतस्थळावर आलेल्या पीडीएफ आता व्हॉट्सअॅपवरदेखील आल्या आहेत. बाजारात येण्याआधी पुस्तके व्हॉट्सअॅपवर आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. सातवीची पुस्तके व्हॉट्सअॅपवर आल्याने आता पायरसी होण्याची भीती आहे. बालभारतीची पुस्तके येण्याआधी व्हॉट्सअॅपवर आलेली पुस्तके खरी आहेत की नाही, याविषयी शिक्षण क्षेत्रातून उलटसुलट चर्चा सुरू आहे. बालभारतीचे संचालक सुनील मगर यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रत्येक इयत्तेच्या अभ्यासक्रमाची पुस्तके छापून झाल्यावर ती संकेतस्थळावर टाकण्यात येतात. त्यासाठी ती पीडीएफ केली जातात. इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम बदलला असून तीन विषयांची पुस्तके छापून तयार आहेत. त्याच्या पीडीएफ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अन्य पुस्तके छापून झाल्यावर त्याच्याही पीडीएफ संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याआधीच पुस्तके व्हॉट्स अॅपवर
By admin | Published: April 25, 2017 2:37 AM