लातूर : रशिया आणि युक्रेनमध्ये सध्याला सुरू असलेल्या संघर्षाने चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील शेकडाे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेले आहेत. त्यातील १५ विद्यार्थी मुंबई विमानतळावर बुधवारी रात्री ११ वाजता सुखरूप परतले असून, त्यात लातूरची माेक्षदा कदमचाही समावेश आहे. यासाठी आम्हाला भारतीय दुतावासाची माेठी मदत झाल्याचेही माेक्षदाने सांगितले.
लातूरमधील संताेष कदम यांची माेक्षदा या मुलीने युक्रेनमधील चर्नीव्हिन्सीमधील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश घेतला आहे. यंदाचे पाचवे वर्ष आहे. मात्र, सध्याला रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतीय विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत. महाराष्ट्रातील जवळपास दीड हजारांवर विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. आता ते विद्यार्थी युद्धाच्या पार्श्वभूमीवर मायदेशात परतण्यासाठी धडपड करत आहेत. अनेकांना विमानाचे तिकीट मिळत नसल्याची माहिती माेक्षदा कदमने दिली. बुधवारी रात्री मुंबईत दाखल झालेल्या विमानामध्ये महाराष्ट्रातील जवळपास १५ विद्यार्थी असल्याचे ती म्हणाली तर विमानातील निम्मे प्रवासी हे विद्यार्थी हाेते. युद्धाला ताेंड फुटल्याने भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी युक्रेनमधील भारतीय दुतावासाकडून वेळाेवेळी सूचना केल्या जात आहेत. भारतात परतण्यासाठी येत्या आठवड्यात दाेन विमाने आहेत. २७ फेब्रुवारी आणि ४ मार्चला ते भारताच्या दिशेने उड्डाण करतील. ताेपर्यंत परिस्थिती काय हाेईल, ही चिंता भारतीय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असल्याचे माेक्षदाने ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.
मुलगी मायदेशी सुखरूप परतली...माझी मुलगी गत चार वर्षापासून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी वास्तव्याला हाेती. मात्र, रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची माहिती मिळताच आम्हाला चिंता लागली हाेती. आम्ही माेक्षदाला मायदेशात परतण्याबाबत आग्रह करत हाेताे. अखेर तिचे विमान मुंबई विमानतळावर बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले आणि जीव भांड्यात पडला, असे माेक्षदाचे वडील संताेष कदम म्हणाले.