मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, राज्यात अजूनही अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे रिक्त जागांवरून दिसत आहे. यंदा अभियांत्रिकीच्या राज्यात तब्बल ५५,४४४ जागा रिक्त राहिल्या, तर फार्मसीच्या केवळ १,७२९ जागांवर प्रवेश झाले नसल्याची माहिती आहे. राज्यातील पदवी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या शासकीय संस्थांमधील बहुतांश जागा भरल्या आहेत. मात्र, विनाअनुदानित संस्थांमध्ये निम्म्याहून अधिक जागा रिक्त असून, वर्ग ओस पडले आहेत. राज्यभरातील ३३१ संस्थांमध्ये यावर्षी १ लाख २३ हजार ८९५ जागा होत्या. जागा रिक्त राहण्याचे प्रमाण ४४.७५ टक्के आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४ टक्क्यांनी कमी झाले आहे, यंदा मुळातच अभियांत्रिकीच्या जागा घटल्याने ही रिक्त जागांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, राज्यात फार्मसीच्या ३२१ संस्थांमध्ये २५,३२७ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २३,६४१ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. म्हणजे फक्त ६.८२ टक्के जागा रिक्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फार्मसी (औषधनिर्माण शास्त्र) आणि संबंधित क्षेत्रातील रोजगाराला पर्यायाने अभ्यासक्रमाला मागणी वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.पदवीप्रमाणे अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ एम. ई. (अभियांत्रिकी पदव्युत्तर)च्या असलेल्या १९६ संस्थांत १२,४५६ इतक्या जागा होत्या. त्यापैकी ५,५७९ जागांवर प्रवेश झाले. रिक्त जागा राहण्याची टक्केवारी ५५.२१ टक्के आहे. पदवीप्रमाणे अभियांत्रिकी पदव्युत्तरची मागणीही विद्यार्थ्यांकडून कमी होत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे फार्मसी पदव्युत्तरच्या २० टक्के जागा राज्यात रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील ११३ संस्थांमध्ये फार्मसीच्या ३,२०० जागा उपलब्ध होत्या, त्यापैकी २,५५८ जागा भरल्या असून, ६४२ जागा रिक्त राहिल्या आहेत.
यंदाही विद्यार्थ्यांची फार्मसीलाच पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 4:46 AM