- यदु जोशी मुंबई : राज्याच्या प्रमुख शहरांमधील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी सोमवारी रस्त्यावर आले अन् त्यांनी ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात केलेल्या आंदोलनामागचा सूत्रधार हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ नावाचा तरुण होता, ही बाब समोर आल्यानंतर सोशल मीडियाचा एक घातक पैलू समोर आला. त्याचवेळी भडकाऊ भाषा वापरणारा हा हिंदुस्थानी भाऊ हजारो मुलांचा इन्स्ट्राग्रामच्या माध्यमातून नेता झाला अन् पोलीस, गुप्तचर यंत्रणाही चक्रावली. यानिमित्ताने गुप्तचर यंत्रणेचे अपयशही समोर आले.
आंदोलने उभी करताना, त्यांना प्रतिसाद मिळवताना राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेत्यांना प्रचंड कष्ट उपसावे लागतात. आंदोलनांबाबत प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन जागृती करावी लागते. गावोगावी जाऊन भूमिका मांडत आंदोलनांचे महत्त्व पटवून द्यावे लागते. तेव्हा कुठे आंदोलनाची धग तयार होते. आंदोलनाची पार्श्वभूमी तयार करावी लागते.
हिंदुस्थानी भाऊने एकाच ठिकाणी बसून इन्स्ट्राग्रामचा वापर करत हजारो विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणले, आंदोलन करायला लावले. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करत अशा पद्धतीने इतके मोठे आंदोलन एकाचवेळी होण्याचा हा पहिलाच प्रसंग. या भाऊने आंदोलनाची परिमाणेच बदलवून टाकली. तरुणांची माथी भडकविणारी भाषा वापरत त्याने इन्स्टाग्रामचा खुबीने वापर करून घेतला.
आंदोलन अन् त्यातील मागणी योग्य होती की अयोग्य यावर खल होत राहील पण अशा पद्धतीनेही आंदोलन उभे राहू शकते, हे उदाहरण अनेकांना विचार करायला लावणारे आहे. ऑफलाईन परीक्षेला विरोध करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा विषय प्रस्थापित विद्यार्थी संघटनांनी हाती घेतला नाही म्हणा किंवा ही मागणी अनाठायी असल्याचे त्यांना वाटले असावे. पण असे हजारो विद्यार्थी मग भरकटतात आणि भडकाऊ भाषा वापरणाऱ्या हिंदुस्थानी भाऊचे समर्थक बनतात, ही बाब अस्वस्थ करणारी नक्कीच आहे. ऑफलाईन परीक्षाच नको असलेल्या तरुणांच्या फौजेचा हिंदुस्थानी भाऊ हा विकृत नेता आहे. या भरकटलेल्या मोबाईलग्रस्त पिढीच्या नेतृत्वाचा हा भाऊ एक विद्रुप चेहरा आहे.
गुप्तचर यंत्रणा काय करत होती? -हिंदुस्थानी भाऊने हे आंदोलन पेटवताना वापरलेल्या चिथावणीखोर भाषेतून हजारो विद्यार्थी आंदोलनात उतरू शकतात, याचा अंदाज राज्याच्या पोलीस यंत्रणेला, गुप्तचर यंत्रणेला न येणे हे मोठे अपयश आहे. तसेच सायबर गुन्हे शाखेचेही अपयश आहे. प्रत्येक शहरातील तरुण सोमवारी चॅनेलला बाईट देत होते की, हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही हे आंदोलन केले. - आमचा मुद्दा कोणी हातातच घेत नव्हते, हिंदुस्थानी भाऊ आमचा हिरो आहे. त्याच्या आंदोलनाचे आवाहन करणाऱ्या व्हिडीओला हजारोंच्या तरुणाईचा भरघोस ऑनलाईन प्रतिसाद मिळतोय, त्या प्रतिसादाची भाषाही आक्रमक आहे, याचा अदमास गुप्तचर यंत्रणेला आला नाही. ज्या-ज्या शहरात सोमवारी आंदोलन झाले, तेथे या हिंदुस्थानी भाऊविरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
मुलांच्या भवितव्याशी खेळू नका-पटोले विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून, त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यावर चर्चा करून सरकार मार्ग काढेल; परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबवू नये, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
गुणवत्ता राखण्यासाठी ऑफलाईन परीक्षा आवश्यक आहे. आजचे आंदोलन हे अराजकता माजविण्याच्या उद्देशाने केलेले आहे. असे आंदोलन आणि त्यातील मागणीलाही आमचा विरोधच आहे.- अमित ढोमसे, कोकण प्रदेश मंत्री, अभाविप.