कल्याण : कॉलेजमधील तरुण-तरुणी, त्यातही सोशल मीडियावर सर्वाधिक काळ घालवणारे आणि आक्रमक विचारसरणीचे आकर्षण असणारे तरुण हे इसिसचा हस्तक असलेल्या रिझवान खानचे टार्गेट असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तपणे कारवाई करून शनिवारी रिझवानला कल्याण येथून अटक केली आहे. अंजुम सलीम भाटकर या घरमालकिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.वेगवेगळ्या गुन्ह्यांत तुरुंगवास भोगलेल्यांवर रिझवानचे लक्ष होते. विशिष्ट समुदायालाच गुन्ह्यांत अडकवले जाते, अशी भावना ज्यांच्यात बळावलेली असते त्याचा फायदा घेत त्यांच्यावर आपल्या विचारसरणीचे जाळे टाकण्याचा प्रयत्न रिझवान करीत असे, असाही आरोपही त्याच्यावर केला जातो. रिझवान सहा वर्षांपूर्वी कल्याणला आला. पत्रीपुलानजीक असलेल्या सूर्यमुखी इमारतीत पहिल्या मजल्यावर तो भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. या उच्चभ्रू वस्तीत राहण्यासाठी त्याला नेमकी कोठून आर्थिक मदत केली जात होती, हेही शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय तो रेल्वेत फेरी करून कटलरी साहित्य विकत असे. तो शिकवण्याही घेत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शिकवणीसाठी येणाऱ्यांची माहितीही गोळा केली जात आहे.कल्याणमध्ये आल्यावर रिझवानने लग्न लावून देणाऱ्या वकिलांचा एजंट म्हणूनही काम सुरू केले. ख्रिस्ती आणि हिंदूधर्मीय तरुणींच्या धर्मांतराची व त्यातून लग्ने लावल्याची कागदपत्रे त्याच्या घरातून सापडली. त्यातीलच एक जोडपे केरळमधून इसिसमध्ये भरतीसाठी गेल्याने लव्ह जिहाद, धर्मांतर प्रसार असे मुद्दे चर्चेत आले. (प्रतिनिधी)मे २०१४मध्ये कल्याणमधून सहिम तानकी, आरिब माजिद, अमान तांडेल आणि फहाद शेख हे चार तरुण बेपत्ता झाले होते. ते इसिसमध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी मोबाइलवरून मेसेज करून कळवले होते. त्यानंतर, दहशतवादी कारवायांत आरिब माजिद मारला गेल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, तो जिवंत भारतात परतल्यावर त्याला अटक करण्यात आली. मात्र, अद्याप सहिम तानकी, अमान तांडेल आणि फहाद शेख यांचा थांगपत्ता नाही. हे चारही तरुण रिझवान खान याच्या सान्निध्यात होते का, या अंगानेही दहशतवादविरोधी पथक तपास करीत आहे. सहा महिन्यांपूर्वी सना फातिमा या महिलेने अनेक जणांकडून एक लाख रुपये गोळा करून त्याबदल्यात महिन्याला १२ हजारांचे व्याज देण्याचा धंदा केला होता. त्यातून तिने ४० कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणाचा भांडाफोड करून फसवले गेलेल्यांना न्याय मिळवून देण्यात रिझवानची महत्त्वाची भूमिका होती. मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेने सना फातिमा हिला अटक केली होती. त्यानंतर, तो फसवल्या गेलेल्यांशी नेमक्या कोणत्या प्रकारे संपर्कात होता, याचाही तपास केला जात आहे.रिझवान खान हा मूळचा केरळचा आहे. केरळमधून २१ तरुण-तरुणी बेपत्ता आहेत. ते इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केरळमधील बेस्टी व मेरीन यांनाही धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले होते. नवी मुंबईतील आर.सी. कुरेशी याने मुस्लीम धर्मात येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला होता. नंतर त्यांचे मतपरिवर्तन करून इसिसमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर, बेस्टी व मेरीन बेपत्ता असल्याची माहिती त्यांचे मेहुणे येरीन यांनी चौकशीत दिली होती. खान हा कुरेशीच्या सान्निध्यात होता. तसेच तो इंडियन इस्लामिक रिसर्च सेंटर या एनजीओचे काम करीत होता.