मुंबई : गेली काही वर्षे प्रलंबित असलेली मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती लवकरात लवकर देण्यात येईल. सुमारे दोन लाख ८५ हजार अर्ज प्रलंबित होते. ही सर्व प्रकरणे निकाली लावून शिष्यवृत्तीची सर्व रक्कम देण्यात येईल. तसेच या वर्षापासून कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी डी. बी. टी. हे वेब पोर्टल सुरू करण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. शिक्षण शुल्क समितीने अनेक महाविद्यालयांचे शुल्क निश्चित केले नव्हते. शुल्क निश्चित झाल्यानंतर महाविद्यालयांकडून आलेले अनेक अर्ज अपूर्ण होते. याशिवाय इतर तांत्रिक कारणामुळे शिष्यवृत्ती देण्यास विलंब लागल्याचे स्पष्टीकरण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान दिले. मात्र केंद्र शासनाकडून निधी मिळाला असल्याने टप्प्याटप्प्याने पुढील दोन-तीन महिन्यांत प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात येईल, असेहीत्यांनी सांगितले. या वेळी झालेल्या चर्चेत अनिल सोले, निरंजन डावखरे, हरिभाऊ राठोड, नागो गाणार, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये आणि धनंजय मुंडे आदींनी सहभाग घेतला होता.
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही - बडोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 2:51 AM