मुंबई - विद्यापीठ व महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवाल, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसंदर्भातही त्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांचं मोठं नुकसान झालं असून शैक्षणिक क्षेत्रालाही फटका बसला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा, विद्यार्थ्यांचे क्लास आणि प्रवेश प्रक्रिया यांचं नियोजन करताना सरकारच्या नाकी नऊ आले आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून अद्यापही शाळा व महाविद्यालये बंदच आहे. त्यामुळे, प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रियाही रखडली आहे. मात्र, आता मिशन बिगेन अंतर्गत शाळा व महाविद्यालये सुरू करण्याचा विचार आहे. ''उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) दिनांक १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२० दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा.'', अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन दिली आहे.
अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यंना परीक्षा सहज, सोप्या पद्धतीने कशा घेता येतील यावर विचार करावा. कुलगुरूंचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्यावे, समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशा सूचना राज्यपालांनी भेटीदरम्यान, केल्याचे सामंत यांनी माध्यमांना सांगितले. ऑनलाइन परीक्षांबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह गरीब विद्यार्थ्यांसमोर नेटवर्क आणि संसाधनांच्या समस्या आहेत. त्यावर सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षांपासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित विद्यापीठाचीच असेल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा
पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात या पूरस्थितीचा मोठा फटका बसला असून तब्बल 5 हजार कुटुंब बाधित झाले आहेत. नदीकिनारच्या शेतीचेही मोठे नुकसान झालंय. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे, पूर्व विदर्भातील विद्यार्थ्यांना जेईई परीक्षेसाठी हजर राहता येईल का, हा मोठा प्रश्न आहे. मात्र, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काळजी न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केलंय.