मनीष चंद्रात्रे, जळगावशहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या खेडी गावातील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थी जास्त अन् खोल्या कमी असल्याने विद्यार्थ्यांनी नाइलाजास्तव वसतिगृहातील शौचालय आणि बाथरूमचा वापर बंद करून तेथे अभ्यासिका सुरू केल्याचे धक्कादायक चित्र मंगळवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारे उघड झाले. वसतिगृहात चार खोल्या अन् १२५ विद्यार्थी आहेत. एका खोलीत सुमारे २० विद्यार्थी राहतात. झोपण्यासाठी त्यांना पुरेशी जागा नाही. जागेअभावी विद्यार्थ्यांनी शौचालय व बाथरूममध्ये अभ्यास सुरू केला आहे. वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सोमवारपासून अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने मंगळवारी दुपारी १०.३० ते ११.३० या वेळेत वसतिगृहाला भेट दिली. त्यात धक्कादायक वास्तव समोर आले. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हणतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न मिळत आहे. संबंधित ठेकेदार बाळू कणखर यांच्याकडे स्वयंपाकाचा ठेका देण्यात आला आहे. मात्र, वसतिगृहात जे अन्न शिजविले जाते; ते अगदी बेचव असते. विद्यार्थ्यांना उपाशी राहूनच दिवस काढावा लागतो. ठेकेदार बदलून मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्यापही प्रश्न निकाली निघालेला नाही.
विद्यार्थ्यांचा शौचालयात अभ्यास!
By admin | Published: December 03, 2014 3:24 AM