आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१३ - इंग्रजी व गणित या दोन विषयात नापास झाल्याने चेतन रमेश पाटील (वय १६) या दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता नांद्रा, ता.जळगाव येथे घडली.
चेतन हा नांद्रा येथील श्री दत्त हायस्कुलचा विद्यार्थी होता.याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दहावी परिक्षेचा मंगळवारी दुपारी आॅनलाईन निकाल जाहीर झाला. दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी व त्याचे मित्र गावातील एका रसवंतीजवळ बसलेले होते. तेथे चेतन हा देखील होता. सर्वांनी मोबाईलवर आॅनलाईन निकाल पाहिला असता त्यात अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर चेतन हा नापास झाल्याचे दिसले.
अन् घरात जावून घेतला गळफास
निकाल पाहिल्यानंतर चेतन हा मित्रांजवळून उठून थेट घरी गेला. वडील जळगावात कामानिमित्त तर आई, लहान भाऊ बंटी याला घेण्यासाठी धुळे येथे गेलेली होती. त्यामुळे घरी कोणीच नव्हते. घरात साडीच्या साहाय्याने त्याने गळफास घेतला. सोबत असलेला एक मित्र त्याला लागलीच पाहण्यासाठी आला असता घराचा दरवाजा उघडा दिसला. तर चेतन याने गळफास घेतला होता. त्या मित्राने त्याला तत्काळ खाली उतरविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्याकडून शक्य झाले नाही. त्याने अन्य मित्रांना बोलावून चेतनला खाली उतरविले.
पायाला झटके येत असल्याने गावातील डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आले. त्यांनी त्याची तपासणी करुन जळगावला नेण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.